अवधा बु व खुर्द येथील महावितरणचा कारभार रामभरोसे; निष्काळजीपणामुळे कधीही मोठ्या अपघाताची शक्यता - Maratha Darbar

Breaking

Wednesday, September 30, 2026

अवधा बु व खुर्द येथील महावितरणचा कारभार रामभरोसे; निष्काळजीपणामुळे कधीही मोठ्या अपघाताची शक्यता

 अवधा बु व खुर्द येथील महावितरणचा कारभार रामभरोसे; निष्काळजीपणामुळे कधीही मोठ्या अपघाताची शक्यता




नांदुरा : सोपान पाटील...


       नांदुरा तालुक्यातील अवधा बु व खुर्द आणि परिसरात महावितरणच्या ढिसाळ व अक्षम्य हलगर्जीपणामुळे केव्हाही मोठा विद्युत अपघात घडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अवधा बु व खुर्द शिवारात आणि गावांतर्गत भागात वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेची दुरवस्था झाली असून, वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे नांदुरा कार्यालय या गंभीर समस्येकडे पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

अवधा बु मधील धोक्याची मुख्य केंद्रे:

• गावातील व शेतातील लोंबकळणाऱ्या उच्च दाबाच्या तारा: अवधा बु शिवारातील अनेक शेतांमधून गेलेल्या मुख्य वीजवाहिन्या कमालीच्या खाली आल्या आहेत. झाडांच्या फांद्या वीज तारांवर घासल्या जात असून यामुळे सातत्याने शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडत आहेत. शेतात पिके उभी असताना किंवा शेतमजूर काम करत असताना या तारा जमिनीला टेकण्याच्या बेतात आल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

• उघड्या डीपी (रोहित्र) आणि फ्युजचा धोका: गावाजवळील ट्रान्सफॉर्मरचे दरवाजे गंजून तुटले आहेत. वीज प्रवाह नियंत्रित करणाऱ्या फ्युजच्या तारा अत्यंत धोकादायक पद्धतीने उघड्यावर लटकत आहेत. परिसरात पाळीव जनावरांचा राबता असल्याने एखाद्या जनावराला करंट लागून दुर्घटना घडण्याची भीती दिवसेंदिवस वाढत आहे.व कर्मचाऱ्यांनी विद्युत खांबावरील तार पूर्णपणे कापून खाली पडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता.

• जीर्ण झालेले खांब: अनेक वर्षांपूर्वी बसवलेले वीज खांब आता जीर्ण झाले असून काही खांबांना तडे गेले आहेत. जोरदार वाऱ्यात हे खांब कोसळण्याचा मोठा धोका असून महावितरण मात्र कोणतीही पूर्वदुरुस्ती करताना दिसत नाही.

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

अवधा बु येथील त्रस्त शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर बोलावून ही भीषण परिस्थिती दाखवून दिली. "केवळ तात्पुरती मलमपट्टी करून कर्मचारी निघून जातात, कायमस्वरूपी खांब बदलणे किंवा तारा ताणण्याचे काम केले जात नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

एकीकडे वीज बिल वसुलीसाठी तगादा लावणारे अधिकारी ग्राहकांच्या सुरक्षेकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. अवधा बु येथे जर कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर अपघात झाला, तर त्याला सर्वस्वी महावितरणचे जबाबदार अधिकारीच कारणीभूत असतील, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच आठवडाभरात यावर योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे.