माटरगाव बु. येथील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये राष्ट्रीय पोषण कार्यक्रम उत्साहात
माटरगाव बु. : येथील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय पोषण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गौरी शेगोकार तसेच ग्रामसखी ज्योतीताई जगताप उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी बालकांचे आरोग्य, संतुलित आहार, स्वच्छता तसेच माता व बालकांच्या आरोग्याची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
अंगणवाडी सेविका संगीता ताई तायडे यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण व सकस आहाराचे महत्त्व विशद केले. तसेच सेविका अन्नपूर्णाताई घाटे, निर्मला निमकर्डे व जयश्री वानखडे यांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना यांसह विविध शासकीय योजनांची माहिती दिली. पात्र माता व मुलींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
