भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक- महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले* - Maratha Darbar

Breaking

Friday, April 10, 2026

भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक- महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले*

 *भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक- महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले*


  

महाराष्ट्र ही संतांची भूमी असलेल्या प्रदेशात अनेक महापुरुष जन्माला आले. त्यांच्या जीवन कार्याने व संत साहित्याच्या  तत्वज्ञानातून महाराष्ट्रात समतेच्या विचारसरणीतून वैचारिक ठेवण प्राप्त झाली असली तरी अशा महाराष्ट्रात जात,धर्म, पंथ,भाषा, लिंग, प्रदेश या सर्वांमध्ये समता  निर्माण व्हावी, अज्ञानाची व समाजातील विषमतेची काळरात्र संपवून न्यायाची बंधुतेची पहाट ज्यांच्यामुळे झाली ते महान समाज सुधारक,थोर शिक्षण तज्ञ, बहुजनांचे उद्धारक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, शेतकऱ्यांचे व कामगारांचे नेते, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल इ.स. 1827 मध्ये पुणे येथे झाला.

     शिक्षणाची  तीव्र ओढ असणारे ज्योतिबा अतिशय तल्लख बुद्धीमत्तेचे असल्याने शिक्षणात कमालीचे बुद्धिमान होते. आपल्या महान ध्येयसिद्धीसाठी मजबूत शारीरिक सामर्थ्य असावे यासाठी बालपणीच खेळ, व्यायाम, शिस्तीची सवय लावून त्यांनी  आपले शरीर घडवले. बालवयापासून सामाजिक भान असणाऱ्या ज्योतिबांनी आजूबाजूला समाजात घडणाऱ्या अनिष्ट चालीरीती, परंपरा, अस्पृश्यता यांचा अभ्यास करून त्यात सुधारणा कशा करता येतील यावर चिंतन केले. हिंदुस्तानातील जनता सामाजिक गुलामगिरीत बंदिस्त असल्यामुळे तिचा बौद्धिक व आध्यात्मिक उत्कर्ष होणे गरजेचे होते. म्हणून सर्वांना बुद्धीप्रामाण्यवादी, विज्ञानिष्ठ  शिक्षणाची गरज आहे. विवेकवादीदृष्टी, ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करून बुद्धीच्या अनुभवाच्या चिकित्सक वृत्तीच्या साह्याने प्रत्येक सिद्धांताकडे पाहून समाजातील परिस्थितीची कारणमीमांसा करता येईल, यासाठीच सन 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करून सामाजिक क्रांतीचा पाया रचला. पुढे 3 जुलै 1851 मध्ये सर्वच बहुजनांसाठी दुसरी शाळा काढली.

       नवयुग घडविणारे महापुरुष हे मानवतावादाचे महान पुजारी असतात. ज्योतिबांनी सामान्य,अति सामान्यांच्या दुःखाचे मूळ व्यवस्थेत असून ते दूर करण्यासाठी व समता प्रस्थापित करण्यासाठी विद्रोह पुकारला. महात्मा फुले यांचे हे कार्य गुलामगिरी विरुद्ध न्यायाच्या लढ्याचे अविभाज्य अंग होते.

    हिरा ठेविता ऐरणी|वाची मारिता जो घणी||

तुका म्हणे तोची संत|सोशी जगाचे आघात||

    महापुरुषाचा समाजासाठीचा संघर्ष खूप कठीण असतो हे तुकोबांनी वरील मार्मिक ओळीतून विषद करुन सांगितले. यासाठीच अनेक यातना, कष्ट सहन करून तुकोबा व ज्योतिबा महान पदाला पोहोचले.

      तुकोबाराय नंतर इतक्या तळमळीने व सडेतोडपणाने केलेले वाङ्मय कार्य ज्योतिबांचेच. त्यांचे सिद्धांत आधुनिक बुद्धीवाद्यास मान्य होण्यासारखे आहेत. म्हणूनच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून आपल्या समाज मंदिरावर कळस चढविला व त्यांच्या कार्यास चिरस्वरूप प्राप्त करून दिले.

      सर्वसामान्य व गोरगरिबांना शिक्षणच तारु शकते  याकरिता हंटर कमिशन पुढे मोफत शिक्षणाची मागणी केली.

  स्वाभिमानाला पारख्या झालेल्या समाजाला माणसात आणण्यासाठी अस्पृश्यांची पहिली शाळा स्थापन केली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ग्रंथ "who were shudras?" महात्मा ज्योतिराव फुले यांना अर्पण केला. समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण तयार केले.

      स्त्रियांच्या गुलामगिरी वर पहिली कुऱ्हाड घालून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. समाजात अनेक जाचक चालीरीती, परंपरा रूढ होत्या. महात्मा फुले यांनी विधवा विवाह व्हावेत यासाठी खडतर कार्य केले. पतीच्या निधनानंतर केशवपन करून त्या स्त्रीला कुरुप केले जाई.या परंपरेला विरोध करुन न्हाव्याचां  संप ज्योतिरावांनी घडवून आणला. 8 मार्च 1860 रोजी पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला.

       सती प्रथेला कडाडून विरोध करून जनजागृती केली. या घातक प्रथेला आळा बसविला. विधवा भगिनी व सती प्रथेबद्दल त्यांचे निरीक्षण अत्यंत मोलाचे व डोळ्यात अंजन घालणारे होते. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून अनेक स्त्रियांना आधार दिला.तसेच पुरुष अनेक स्त्रियांशी लग्न करतात त्यातून स्त्रियांचा छळ होतो म्हणून द्विभार्या प्रतिबंधन आणले.

        अस्पृश्यांना पाणी मिळावे म्हणून स्वतःचा हौद त्यांच्यासाठी खुला केला. इ.स.   1868 मध्ये स्वतः हौदातून पाणी भरून त्यांच्या डोक्यावर भांडी ठेवली. मानव जात एकच असून मानसाने माणसाशी माणसासारखे वागावे हाच संदेश त्यांनी दिला.

  "विष्णुमय जग|वैष्णवांचा धर्म भेदाभेद |भ्रम अमंगळ||

 महात्मा फुले यांनी त्यांच्या जीवनात शेतीस उत्तेजन दिले. शेतकरी व कामगार यांची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी कार्य केले. शेतकरी सुखी, तर जग सुखी यावर कटाक्ष ठेवून त्यांनी 1889 मध्ये शेतकऱ्याचा पुतळा उभारून शेतकऱ्यांचे दैन्य जगासमोर उभे केले. त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी 'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ लिहिला. महात्मा फुले हे देखील आदर्श शेतकरी होते. 200 एकर शेती मांजरी या गावी घेऊन ती योग्यरीत्या कसली. शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली. शेतकरी जगवून त्याच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट उपसले.

शिवरायांच्या समाधीचा शोध घेऊन छत्रपतींचे कार्यकर्तृत्व, इतिहास जगासमोर आणला व शिवजयंती साजरी केली. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वावर पोवाडा लिहिला.

सत्यशोधक समाजाची स्थापना करुन ज्योतिबांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी नवीन दालन उघडले. शाळा सुरू करून ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार कायमस्वरूपी नष्ट केला.

"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावली"

 रत्नाच्या खाणीत सापडलेला हिरा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. यांचे कार्य महान क्रांतिकारकाचे कार्य असून त्यांचा सुधारणावाद, बुद्धीप्रामाण्यवादावर आधारलेला आहे. शिक्षणाचे व महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व समजून ते आत्मसात करून एक समताधिष्ठित आदर्श समाजाची व राष्ट्राची उभारणी आपण सर्वांनी करावी हीच आजच्या काळाची गरज आहे.

                रवींद्र खराटे सर

                तालुका अध्यक्ष

मराठा सेवा संघ, मलकापूर