३० मार्च २०२६ पासून सजनपुरी येथील शिवभक्त सोनू सीताराम कौशल व समस्त ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयासमोर 'आमरण उपोषणास' बसणार आहेत
खामगांव सजनपुरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी शासकीय आदेशाचे उल्लंघन करून जयंती साजरी न केल्याच्या निषेधार्थ आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नसल्याने, ३० मार्च २०२६ पासून सजनपुरी येथील शिवभक्त सोनू सीताराम कौशल व समस्त ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयासमोर 'आमरण उपोषणास' बसणार आहेत.
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सजनपुरी ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी करण्यात आली नव्हती. या संदर्भात सोनू कौशल यांनी पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती. मात्र, प्रशासकीय चौकशीत ग्रामसेवकाने 'बेड रेस्ट'चे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आणि 'एडिटेड' (बनावट) फोटो जोडून प्रशासनाची दिशाभूल केली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दिवशी सरपंच "नातेवाईकाचे निधन झाले" असे सांगून ग्रामपंचायतीत गैरहजर होते, त्याच दिवशी ते गावातील उर्दू शाळेत शिवजयंतीच्या कार्यक्रमात हजर असल्याचे फोटो पुराव्यानिशी समोर आले आहेत.
**धमकी आणि पोलिसांची भूमिका:**
या भ्रष्टाचाराचा आणि शिवरायांच्या अवमानाचा जाब विचारला असता, सरपंचांच्या मुलाने (सय्यद मुजफ्फर उर्फ मुज्या) सोनू कौशल यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे **कलम ३५१(३) BNS** अन्वये गुन्हा (NC No. 0075/2026) दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपीवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही.
**मुख्य मागण्या:**
१) बनावट फोटो आणि खोटे अहवाल सादर करणाऱ्या ग्रामसेवकाचे तात्काळ निलंबन करावे.
२) कर्तव्यात कसूर करणाऱ्या व खोटे उत्तर देणाऱ्या सरपंचावर 'कलम ३९' नुसार कारवाई करावी.
३) तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी.
४) या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा स्तरावरून निष्पक्ष फेरचौकशी व्हावी.
**अंतिम इशारा:**
"प्रशासनाने सर्व तांत्रिक पुरावे असूनही केवळ कागदी घोडे नाचवून दोषींना पाठीशी घातले आहे. जोपर्यंत दोषी सरपंच व ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही," असा पवित्रा सोनू कौशल व सजनपुरी ग्रामस्थांनी घेतला आहे. या उपोषणाला सकल हिंदू समाज आणि विविध शिवप्रेमी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
