सजनपुरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा कळस; 'मेरी पंचायत' ॲपचा गैरवापर; महिलांच्या नावावर शासकीय निधी हडपल्याचा संशय!
खामगाव (अजयसिंह राजपूत): तालुक्यातील सजनपुरी ग्रामपंचायतीमध्ये सध्या भ्रष्टाचाराचे आणि मनमानी कारभाराचे थैमान सुरू असल्याचे समोर आले आहे. 'मेरी पंचायत' ॲपवरील गैरप्रकार, घरकुल योजनेतील वशिलेबाजी आणि शिवजयंती साजरी न केल्याच्या गंभीर आरोपांनंतर आता सरपंच पुत्राने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सोनू सीताराम कौशल व इतर ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
काय आहेत नेमके आरोप?महिलांच्या गोपनीयतेचा भंग: 'मेरी पंचायत' ॲपवर गावातील पाच महिलांची नावे आणि मोबाईल क्रमांक त्यांच्या संमतीशिवाय 'वॉटर टेस्टिंग टीम'मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. १ जानेवारी २०२३ पासून हा गैरप्रकार सुरू असून याद्वारे शासकीय निधीचा अपहार झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेत (PMAY) गरजू आणि ५० वर्षांपासून गावात राहणाऱ्या ज्येष्ठांना डावलून ग्रामपंचायत सदस्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना लाभ दिला जात असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीमार्फत अधिकृतरीत्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात नसल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आहे.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत महिलांनी जेव्हा आपल्या नावाच्या गैरवापराबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा ग्रामसेवकांनी अपमानस्पद उत्तरे देऊन सभा अर्धवट बंद केल्याचा दावा करण्यात आला आहे.या सर्व अन्यायाबद्दल जाब विचारला असता, सरपंच पुत्र सय्यद मुजफ्फर सय्यद अकबर (उर्फ मुज्जा) याने तक्रारदार सोनू कौशल यांना सर्वांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर रात्री १ वाजता व्हिडिओ कॉल करून मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम ग्रामस्थांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना कलम ३९ नुसार अपात्र करण्याची मागणी केली आहे. तसेच, येत्या १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाज आणि शिवभक्तांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आम्ही लोकशाही मार्गाने आमचा हक्क मागत आहोत. ग्रामपंचायतीमध्ये 'मेरी पंचायत' ॲपच्या नावाखाली महिलांच्या माहितीचा जो गैरवापर झाला आहे, तो अत्यंत संतापजनक आहे. आमच्या गावातील गरजू लोक आजही घरापासून वंचित आहेत, तर दुसरीकडे वशिलेबाजी करून नातेवाईकांना घरकुल वाटले जात आहे. जेव्हा आम्ही यावर प्रश्न विचारला, तेव्हा आम्हाला सन्मानाने उत्तर देण्याऐवजी सरपंच पुत्राने भरचौकात जीवे मारण्याची धमकी दिली. रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉल करून मानसिक छळ केला जात आहे. जर सामान्य नागरिकाचा आवाज असा दाबला जात असेल, तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा?
— सोनू सीताराम कौशल (मुख्य तक्रारदार)
