नांदुरा महावितरण कनिष्ठ अधिकारी कार्यालयातील गैरप्रकार; आयडी कार्ड नसलेल्या कर्मचाऱ्याच्या उद्धट वागणुकी विरोधात नागरिकांचा संताप - Maratha Darbar

Breaking

Friday, March 20, 2026

नांदुरा महावितरण कनिष्ठ अधिकारी कार्यालयातील गैरप्रकार; आयडी कार्ड नसलेल्या कर्मचाऱ्याच्या उद्धट वागणुकी विरोधात नागरिकांचा संताप

 नांदुरा महावितरण कनिष्ठ अधिकारी कार्यालयातील गैरप्रकार; आयडी कार्ड नसलेल्या कर्मचाऱ्याच्या उद्धट वागणुकी विरोधात नागरिकांचा संताप





नांदुरा : (जि. बुलडाणा )

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कनिष्ठ अधिकारी कार्यालयात आयडी कार्ड नसलेले कर्मचारी खुर्चीवर बसून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कार्यालयात काही कर्मचारी कोणतेही ओळखपत्र (आयडी कार्ड) न लावता कार्यालयात दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यासमोरच संबंधित कर्मचारी स्वतःच नागरिकांशी संवाद साधत असल्याने अधिकृत कर्मचारी कोण आणि बाहेरील व्यक्ती कोण, हे ओळखणे नागरिकांसाठी कठीण झाले आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, वीजपुरवठा, बिलिंग व मीटर संबंधित कामांसाठी कार्यालयात जाणाऱ्या ग्राहकांना काही कर्मचाऱ्यांकडून उद्धट व अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांनी सांगितले की, समस्या मांडण्यासाठी गेल्यावर त्याकडे दुर्लक्ष केले जाते तसेच अधिकारी खुर्चीवर बसलेले असल्यावरही कर्मचारी यांच्याकडून अयोग्य भाष्या बोलल्या जाते, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मार्गदर्शनाच्या नावाखाली गोंधळ निर्माण करणे, योग्य माहिती न देणे आणि ग्राहकांशी गैरवर्तन करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे शासकीय सेवेबाबत नकारात्मक भावना निर्माण होत असून प्रशासनावरील विश्वास कमी होत आहे.

नागरिकांनी या सर्व प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांना आयडी कार्ड सक्तीचे करणे, ग्राहकांशी सन्मानपूर्वक वागणूक देण्यासाठी प्रशिक्षण देणे आणि आयडी कार्ड नसलेल्या व्यक्तींना कार्यालयात बसण्यास मज्जाव करणे आवश्यक असल्याचेही नागरिकांनी नमूद केले.

दरम्यान, जर लवकरात लवकर या प्रकारावर नियंत्रण आणले नाही, तर पुढील काळात आंदोलनाचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.