“
सत्य लिहिल्याची शिक्षा! पत्रकार शेख कदीर यांच्यावर जीवघेणा हल्ला – फावड्याने डोक्यावर वाराचा प्रयत्न”
“तक्रार देऊनही संरक्षण नाही! संग्रामपूरमध्ये पत्रकारावर अज्ञातांचा हल्ला, हात फ्रॅक्चर”
“पत्रकाराला संपवण्याचा कट? आधी धमक्या, मग हल्ला – पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह”
“कलम 353 प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पत्रकारावर हल्ला – प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर”
बुलढाणा:
संग्रामपूर तालुक्यातील निर्भीड पत्रकार शेख कदीर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या हल्ल्यामागे सुनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, हल्ल्यापूर्वी पत्रकारांच्या जीवितास धोका असल्याची थेट लेखी तक्रार 26 जुलै 2025 रोजी तामगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दिनांक 22 जुलै 2025 रोजी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक कोमल रोडे यांच्या कथित गैरप्रकाराचा व्हिडीओ व ऑडिओ पुरावा पत्रकार शेख कदीर यांच्या मोबाईलमध्ये असल्याने त्यांनी 23 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार सादर केली होती. त्यानंतर या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी पत्रकारांविरोधात खोटे आरोप करणारी निवेदने सादर करण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, 22 डिसेंबर 2025 रोजी तामगाव पोलीस स्टेशनने चौकशीसाठी बोलावून घेतल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पत्रकार शेख कदीर यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी फावड्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने प्रसंगावधान राखत पत्रकारांनी वार चुकवला, मात्र हातावर वार बसल्याने हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले. फावडा डोक्यावर लागला असता, जीवितहानी अटळ होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणात हल्ला केवळ अपघाती नसून पत्रकाराला संपवण्याचा कट असल्याचा संशय बळावत आहे. मात्र, अद्याप हल्लेखोरांचा शोध लागलेला नसून संबंधित व्यक्तींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पत्रकार संरक्षण कायदा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ यांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत, दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनांसह नागरिकांकडून होत आहे.
