नांदुरा तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांचा इशारा; मागण्या न मानल्यास 20 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन - Maratha Darbar

Breaking

Thursday, February 12, 2026

नांदुरा तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांचा इशारा; मागण्या न मानल्यास 20 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन

 नांदुरा तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांचा इशारा; मागण्या न मानल्यास 20 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन




नांदुरा (जि. बुलडाणा) – ग्रामरोजगार सहाय्यक संघटना, तालुका नांदुरा यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदुरा यांना निवेदन देण्यात आले आहे. शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ची अंमलबजावणी करणे तसेच ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक अत्यल्प मानधनावर काम करत असून त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरोजगार सहाय्यकांना कामाचे मानधन वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

मुख्य मागण्यांमध्ये शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी, युजर आयडी पासवर्ड उपलब्ध करून देणे, ज्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरोजगार सहाय्यक नाहीत तेथे नवीन नियुक्ती करणे, इतर कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागी ग्रामरोजगार सहाय्यकांची नियुक्ती करणे, तसेच स्थानिक स्तरावरील APO, CDO व PTO यांच्या बदल्या करून इतर तालुक्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आदींचा समावेश आहे.

याशिवाय राजकीय हेतूने पदावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सहाय्यकांना पुन्हा पदावर घेण्याची तसेच राजकीय कारणास्तव निवडलेल्या दुय्यम ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पासून संपूर्ण जिल्ह्यात बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.