पदग्रहण सोहळा की गोंधळाचा मेळा?
नांदुरा नगर परिषदेत महिला व पत्रकार वर्गाला दुय्यम वागणूक!
नांदुरा.... सोपान पाटील का. संपादक
नांदुरा नगर परिषद अध्यक्ष पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला खरा, पण या सोहळ्याच्या झगमगाटामागे अव्यवस्था, दुर्लक्ष आणि प्रशासनाची उदासीनता मात्र चांगलीच उघडी पडली.
सर्वात गंभीर बाब म्हणजे —
महिला वर्गासाठी बसण्याची कोणतीही स्वतंत्र व योग्य व्यवस्था नव्हती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित असताना त्यांना उभे राहावे लागले, जागा शोधत फिरावे लागले. “हा सोहळा नक्की कुणासाठी?” असा प्रश्न अनेक महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
इतकंच नाही तर, पत्रकार बांधवांची अवस्था देखील काही वेगळी नव्हती. बातमी संकलनासाठी आलेल्या पत्रकारांसाठी ना बसण्याची सोय, ना ठरावीक जागा. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना अक्षरशः कोपऱ्यात उभं राहावं लागलं.
या सगळ्या गोंधळाबाबत आमचे प्रतिनिधी थेट प्रशासन व मुख्य अधिकाऱ्यांकडे गेले असता, तिथेही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
“हो हो पाहतो”, “आत्ता व्यवस्था करतो” अशी नेहमीची उत्तरं देत वेळ काढण्याचाच प्रकार सुरू होता. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसली नाही.
संपूर्ण कार्यक्रमात प्रशासन आपल्याच गुर्मीत आणि मग्रुरीत वावरताना दिसले. पदग्रहण सोहळा यशस्वी दाखवण्याच्या नादात, उपस्थितांच्या मूलभूत सोयींकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र होते.
महिला सन्मानाच्या गप्पा, लोकशाही मूल्यांचे भाषणं आणि प्रसारमाध्यमांचे महत्त्व सांगणारे शब्द मंचावरून ऐकू येत होते; पण खाली मात्र वास्तव वेगळंच होतं.
बोलण्यात सन्मान, पण वागण्यात दुर्लक्ष — अशीच भावना अनेक उपस्थितांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे नांदुरा नगर परिषद प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पुढील कार्यक्रमात तरी महिला वर्ग आणि पत्रकार बांधवांना सन्मानाची वागणूक मिळणार का, हा प्रश्न आता उपस्थितांमधून विचारला जात आहे
