*गजानन महाराज संकुल दुकान वाटपात कायद्याचा भंग;* जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
नांदुरा | प्रतिनिधी ( अरुण सुरवाडे )
नांदुरा नगर परिषद अंतर्गत असलेल्या गजानन महाराज संकुल कॉम्प्लेक्समधील दुकाने व गाळे वाटपात कायद्याचा भंग, अधिकारांचा गैरवापर, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत मुकेश अशोक वाकोडे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे.
तक्रारीनुसार, सदर संकुलातील दुकाने व गाळे हे महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, शासन निर्णय व नियमावलीचे उल्लंघन करून भाड्याने देण्यात आले आहेत. याबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी अर्ज करण्यात आला होता. मात्र नगर परिषदेकडून दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्राप्त उत्तर समाधानकारक नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
दुकाने व गाळे वाटप करताना खुली जाहिरात, लिलाव किंवा निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचा आरोप असून भाडे निश्चिती, करार अटी व शर्ती याबाबत कोणतीही पारदर्शकता ठेवलेली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही ठराविक व्यक्तींना अनुचित लाभ देण्यासाठी अधिकारांचा गैरवापर करण्यात आल्यामुळे नगर परिषद व शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैधानिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करून भ्रष्ट आचरण केल्याची ठोस शंका असून हे कृत्य भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ तसेच भारतीय दंड संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या संदर्भात तक्रारदाराने प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी, दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई, नियमबाह्य पद्धतीने दिलेले दुकाने व गाळे रद्द करून शासनाच्या ताब्यात घेणे तसेच शासनाचे झालेले आर्थिक नुकसान दोषींकडून वसूल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधला असता, अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
