बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी अंतिम टप्प्यात - Maratha Darbar

Breaking

Wednesday, January 7, 2026

बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी अंतिम टप्प्यात

 बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी अंतिम टप्प्यात

(अरुण सुरवाडे नांदुरा)

बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी (DCS – डिजिटल क्रॉप सर्वे) उपक्रमाअंतर्गत रब्बी हंगाम 2025 ची पीक नोंदणी प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी 24 जानेवारी 2026 पूर्वी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक 10 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या 7/12 उताऱ्यावर पीक पेरा स्वतः अँड्रॉईड मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये नोंदवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर पीक पाहणी पूर्ण झाली असून उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध नाही किंवा अ‍ॅप हाताळण्यात अडचण येत आहे, त्यांनी संबंधित गावचे तलाठी, कोतवाल, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा DCS साठी नियुक्त सहाय्यकांची मदत घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ई-पीक पाहणीद्वारे नोंदणी न केल्यास 7/12 वर पीक पेरा कोरा राहील, जो नंतर भरता येणार नाही. त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदाने व इतर लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत पीक विमा मिळण्यासाठी अचूक पीक नोंद असणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026 पूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन मा. डॉ. किरण पाटील (भाप्रसे), जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.