बुलढाणा जिल्यातील शेतकऱ्यांसाठी ई-हक्क प्रणाली लागू;
११ प्रकारचे फेरफार आता ऑनलाइन
(अरुण सुरवाडे नांदुरा)
बुलढाणा | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमधील फेरफार प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेगवान करण्यासाठी महसूल विभागाने ई-हक्क (e-Haqq) प्रणाली कार्यान्वित केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्याकडून करण्यात आले आहे.
या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांना आता तलाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने जमिनीवरील फेरफार अर्ज करता येणार आहे. यासाठी
👉 https://pdeigr.maharashtra.gov.in/frmlogin या संकेतस्थळावर लॉगिन करून किंवा दिलेल्या QR कोडद्वारे अर्ज करता येईल.
ई-हक्क प्रणालीतून एकूण ११ प्रकारचे फेरफार ऑनलाइन करता येणार आहेत. त्यामध्ये वारस नोंद, खरेदी-विक्री/गहाणखत, बोजा कमी करणे, बँक नोंद, खातेदारांचे नाव कमी करणे, अ.पु.क./शेरा कमी करणे, पी.एम.नोट कमी करणे, पत्ता किंवा नाव बदल, सुधारित माहिती भरणे, हस्तलिखित व संगणक नोंदीतील तफावत दुरुस्ती तसेच मृत्यूनंतर वारस नोंद यांचा समावेश आहे.
जर कोणत्याही कारणास्तव ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज करता येत नसेल, तर संबंधित शेतकऱ्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरिकांनी ई-हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
