वळती बु येथील गोडबोले बंधाऱ्याचे गेट अज्ञात व्यक्तीने उघडले; लाखो लिटर पाणी वाहून गेले* - Maratha Darbar

Breaking

Friday, November 28, 2025

वळती बु येथील गोडबोले बंधाऱ्याचे गेट अज्ञात व्यक्तीने उघडले; लाखो लिटर पाणी वाहून गेले*

 *वळती बु येथील गोडबोले बंधाऱ्याचे गेट अज्ञात व्यक्तीने उघडले; लाखो लिटर पाणी वाहून गेले*



नांदुरा तालुका – तालुक्यातील वसाळी सर्कलमधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा गोडबोले बंधारा अज्ञात व्यक्तीने रात्री गुपचूप गेट उचलून उघडल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे बंधाऱ्यातील लाखो लिटर पाणी वाहून जाऊन मोठा जलसाठा नष्ट झाला आहे.


या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या वरती बुद्रुक परिसरातील हजारो हेक्टर शेतीचे सिंचन होत असते. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवत असताना या बंधाऱ्यातील साठ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. मात्र आता साठ्यातील 30 ते 40 टक्के पाणी रातोरात वाहून गेल्याने पुढील काळात भीषण पाणीटंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


याच बंधाऱ्यामुळे पंचकोशीतील घाणेगाव, ज्ञानगंगापूर, वळती.बु. खुर्द,बरफगाव, वसाडी बु खुर्द,खळदगाव, माळेगाव, धानोरा या गावांमध्ये नळयोजनेसाठी आवश्यक असलेला पाणी पुरवठा केला जातो.  विहिरींमधून पाणी उपसा करून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. जलसाठा अचानक कमी झाल्याने या सर्व योजनांवरही संकट येऊ शकते.


गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सांगितले की, मागील वर्षी देखील अशीच घटना घडली होती, ज्यामध्ये अज्ञात व्यक्तींनी गेट उचलून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून दिले होते. यावर्षी पुन्हा तशीच घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.


पंचकोशीतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की

👉 सदर घटनेची तात्काळ सखोल चौकशी करावी

👉 अज्ञात व्यक्तींना गुन्त्यात आणून कठोर कारवाई करावी

👉 संबंधित विभागाला सतर्क ठेवून बंधाऱ्याची सुरक्षा वाढवावी


शेतकरी आणि ग्रामस्थांनी माननीय तहसीलदार साहेब तथा जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने लक्ष घालून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.



--