मच्छिंद्र खेड येथे माऊली ग्रुपतर्फे मोफत घरपोच पाणीपुरवठा सुरू! - Maratha Darbar

Breaking

Saturday, October 17, 2026

मच्छिंद्र खेड येथे माऊली ग्रुपतर्फे मोफत घरपोच पाणीपुरवठा सुरू!


 मच्छिंद्र खेड येथे माऊली ग्रुपतर्फे मोफत घरपोच पाणीपुरवठा सुरू!

ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा

मच्छिंद्र खेड / शेगाव : गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी प्रतिटाकी १०० रुपये मोजावे लागणाऱ्या मच्छिंद्र खेड येथील ग्रामस्थांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरदादा पाटील (नाना) यांनी पुढाकार घेत स्वतःच्या टँकरद्वारे गावात मोफत घरपोच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे.

मच्छिंद्र खेड येथील शेतकरी आणि शेतमजुरांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर अतिरिक्त ताण पडत होता. ही समस्या ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी होणारी धावपळ आणि आर्थिक भुर्दंड कमी होण्यास मदत होत आहे.

शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल मच्छिंद्र खेड येथील नागरिकांच्या वतीने ज्ञानेश्वरदादा पाटील (नाना) यांचे आभार मानण्यात आले. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे, उपसभापती श्रीकांत तायडे, मच्छिंद्र खेडचे सरपंच बंडू पाटील, जाणाई संस्थेचे अध्यक्ष ॲड. नकुल पाटील, विठ्ठलराव पाटील, प्रशांत टीकार, विलास ससाने, अमोल भारंबे, राजू पाटील, अजय पाटील, पद्माकर भारंबे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.