यंत्रयुगात बैलांची संख्या घटली; बैलपोळ्याच्या तोंडावर मातीच्या बैलांना मागणी वाढली - Maratha Darbar

Breaking

Wednesday, September 9, 2026

यंत्रयुगात बैलांची संख्या घटली; बैलपोळ्याच्या तोंडावर मातीच्या बैलांना मागणी वाढली


 

यंत्रयुगात बैलांची संख्या घटली; बैलपोळ्याच्या तोंडावर मातीच्या बैलांना मागणी वाढली

बुलढाणा शेगांव: वैज्ञानिक युगात शेतीच्या कामांसाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे महत्त्व हळूहळू कमी झाले आहे. परिणामी ग्रामीण भागात बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटताना दिसून येत आहे. मात्र, बैलपोळ्याच्या पारंपरिक सणाची आठवण आणि ग्रामीण संस्कृतीची नाळ जपण्यासाठी मातीच्या बैलांना आजही विशेष महत्त्व दिले जात आहे.

बैलपोळा सणाच्या तोंडावर बाजारपेठेत विविध आकार व आकर्षक रंगांनी सजवलेले मातीचे बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या पारंपरिक मातीच्या बैलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, कुंभारांनी मेहनतीने तयार केलेल्या मातीच्या बैलांना यंदा चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी शेतीची बहुतांश कामे बैलांच्या मदतीने केली जात होती. नांगरणीपासून ते वाहतुकीपर्यंत बैल हा शेतकऱ्याचा जिवाभावाचा साथीदार होता. मात्र, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि इतर आधुनिक यंत्रांमुळे शेतीची कामे कमी वेळेत व कमी मनुष्यबळात होऊ लागली. त्यामुळे बैल पाळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

बैलांची संख्या कमी झाली असली तरी बैलपोळ्याची परंपरा आणि बैलांप्रती असलेली कृतज्ञता आजही कायम आहे. मातीच्या बैलांच्या माध्यमातून हीच ग्रामीण संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. बैलपोळ्याच्या निमित्ताने बाजारात आलेले हे मातीचे बैल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आकर्षण ठरत असून, बदलत्या काळातही ग्रामीण परंपरेचे दर्शन घडवत आहेत.

▣ प्रतिक्रिया

“यावर्षी मातीच्या बैलांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आकार व सजावटीप्रमाणे मातीच्या बैलांची जोडी २००, ३०० ते ५०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर विक्री आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.”

— मातीचे बैल विक्रेता