इंधन टंचाईच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई: तहसिलदार अजितराव जंगम - Maratha Darbar

Breaking

Friday, March 13, 2026

इंधन टंचाईच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई: तहसिलदार अजितराव जंगम

 इंधन टंचाईच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई: तहसिलदार अजितराव जंगम 


नांदुरा तहसिल प्रशासन सज्ज; 


नांदुरा : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नांदुरा तालुक्यातही अशा प्रकारच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी तहसील प्रशासनातर्फे सर्व गॅस चालक व पेट्रोल पंप धारक यांची काल बैठक आयोजित करण्यात आली होती. साठेबाजी, काळा बाजार, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार अजितराव जंगम यांनी दिला आहे.

सध्या इंधन कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसचा पुरवठा नियमित सुरू असून कोणतीही टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

काही व्यक्तींकडून घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदेशीर साठेबाजी तसेच इंधनाचा काळाबाजार होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर विशेष दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाकडून तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांनी इंधन पुरवठा, साठेबाजी किंवा काळाबाजार याबाबत काही तक्रार अथवा माहिती असल्यास नांदुरा तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार अजितराव जंगम यांनी केले आहे.