सहा वर्षांच्या आदिबाचा चौथा रोजा पूर्ण – अल्लावरच्या प्रेमाची भावनिक कहाणी! - Maratha Darbar

Breaking

Monday, February 23, 2026

सहा वर्षांच्या आदिबाचा चौथा रोजा पूर्ण – अल्लावरच्या प्रेमाची भावनिक कहाणी!

 “सहा वर्षांच्या आदिबाचा चौथा रोजा पूर्ण – अल्लावरच्या प्रेमाची भावनिक कहाणी!




“चिमुकलीची मोठी श्रद्धा वरवट बकाल येथील आदिबाने ठेवला कडक रोजा”पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू!



नारखेड (गजानन डाबेराव):- संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील सहा वर्षीय चिमुकली आदिबा शेख हिने पवित्र Ramadan महिन्यातील चौथा रोजा पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लहान वयातच श्रद्धा, आत्मविश्वास आणि अल्लावर अपार प्रेम यांचे सुंदर उदाहरण तिने घालून दिले आहे.

आदिबा ही शेख इम्रान शेख महेबुब यांची कन्या असून ती नेहमी आपल्या आई-वडिलांना सांगत असे की, “मी पण रोजा ठेवणार.” तिच्या या निरागस इच्छेला यंदाच्या रमजानमध्ये पूर्णत्व मिळाले. पहाटे ४.३० वाजता ती स्वतःहून उठली आणि आईसोबत सहरी करून अल्लाच्या नावाने रोजाची नीयत केली.

दिवसभर तिने कोणतेही अन्न-पाणी ग्रहण न करता संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत रोजा पूर्ण केला. एवढ्या लहान वयातही रमजानच्या उपवासाचे नियम पाळत तिने तोंडात आलेला थुंकीसुद्धा गिळू नये, अशी काळजी घेत उपवासाची शिस्त पाळली.

मुलीची ही जिद्द आणि श्रद्धा पाहून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला मिठी मारली आणि अल्लाकडे दुवा मागितली – “या अल्लाह, माझ्या मुलीला दिवसभर शक्ती दे आणि तिचा हा रोजा कबूल कर.”

आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या काळात लहान मुलांमध्ये धार्मिक मूल्ये, मानवतेची जाणीव आणि ईश्वरावरील प्रेम जपले जात असल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. आदिबाच्या या कृतीमुळे गावातही कौतुकाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी तिच्या जिद्दीचे अभिनंदन केले आहे.

सहा वर्षांच्या या चिमुकलीने दाखवलेली श्रद्धा आणि आत्मविश्वास निश्चितच इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. रमजानच्या या पवित्र महिन्यात आदिबाने पूर्ण केलेला रोजा तिच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे.