श्री
संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराज मंदिरात महाप्रसादाचे वितरण
दर्शनासाठी जळगावसह परिसरातील भाविकांची गर्दी
जळगाव जामोद : श्रीसंत सखाराम महाराज संस्थान (सखारामपूर) संचालित योगीराजनगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात आध्यात्मिक कार्यक्रमाने व महाप्रसाद वितरणाने श्रींचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती.
श्रीसंत गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रकट दिनानिमित्त जळगाव जामोद येथील श्रींच्या मंदिरात रविवारी सकाळी सात वाजतापासून रात्री ११ पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या तर विलासबापू देशमुख यांच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा जवळ जवळ सात हजार भक्तांनी लाभ घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीत प्रकट दिन साजरा झाला. श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, श्रींच्या पादुकांचा अभिषेक, श्रींची महाआरती, श्रींचे भजन व पालखीची मंदिर परिक्रमा असे आध्यात्मिक कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते.
गजानन महाराज मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेताना परिसरातील भाविक.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सहकार्य
या प्रकट दिन महोत्सवासाठी श्री संत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापक श्रीकृष्ण पाटील, पी. एस. निर्मळ, तायडे गुरुजी, सारंगधर भिसे, विठ्ठलराव पारस्कर, एकनाथ पाटील, बळीराम धुळे, राऊत, महेश पारस्कर, राजू महल्ले, प्रा. ऋषीकेश कांडलकर, धनंजय देशमुख, राहुल देशमुख,ऋषीकेश गोंड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी श्रींची महाआरती भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख व देशमुख परिसरातील सदस्य यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जळगावसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसराला यात्रेचे स्वरूप
श्रींच्या प्रकट दिनानिमित्त योगीराजनगर परिसरात मोठी यात्रा भरली होती. व्यावसायिकांनी विविध प्रकारची दुकाने थाटली होती. या सर्व दुकानांमधून वस्तू खरेदीचा लाभ भक्तांनी घेतला.
चोख पोलिस बंदोबस्त !
रविवार हा सुटीचा दिवस असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांचा दर्शनासाठी असणारा ओघ हा मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे पोलिस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लेडीज कॉन्स्टेबलसह १५ पोलिसांचा स्टाफ ठाणेदारांनी तैनात केला होता.
