*मलकापुर नांदूरा रोडवर बायोडिझेल पंपाच्या टाकीत पडून गुदमरून मलकापूरच्या दोन तरुणांचा मृत्यू; एकावर उपचार सुरू, नायगाव फाट्यावरील घटना*
(
अरुण सुरवाडे नांदुरा मलकापुर)
*मलकापूर नांदूरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नायगाव फाट्यानजीक घडलेल्या हृदयद्रावक घटनेत बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून तिसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. हा प्रकार दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आला. मृतांमध्ये साजीदखान जलीलखान (वय २२) आणि मुस्ताकखान जब्बारखान (वय ३८) यांचा समावेश आहे. तर आरिफखान बशिरखान (वय ३८) हा गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेही मलकापूरच्या पारपेठ प्रभागातील रहिवासी असून दि. २५ रोजी रात्री ९.३० वाजता घरातून बाहेर पडले होते. काही वेळाने पंपावरून त्यांचे कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरा दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तर गंभीर आरिफखान याला आयुष्यमान रुग्णालयात दाखल करून शर्थीचे उपचार सुरू आहेत. दरम्यान, संबंधित बायोडिझेल पंप पूर्वीपासूनच बंद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे मृत आणि जखमी तरुण तिथे नक्की का गेले होते. पंपाची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेले होते का? की इतर काही कारण होते याबाबत विविध शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.
या घटनेमुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे

