हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत जनावरे चोरी करणारी टोळी गजाआड
- तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन
अंतर्गत येणाऱ्या नादेवी शिवारातून बकरी आणि बोकड चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. यावेळी पोलिसांनी तिन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण एक लाख 22 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपींनी चोरीसाठी वापरलेली चारचाकी वाहन सुध्दा पोलिसांनी जप्त केली आहे. गजानन देशमुख यांच्या शेतातील बकऱ्या आणि बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. गजानन देशमुख यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातील बकरी आणि बोकड चोरीला
गेले होते. त्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, काही स्थानिक आरोपींनी ही चोरी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले. संशयित आरोपी मध्ये आदित्य सुनील इंगळे (22), कृष्णा केशव इंगळे (19) आणि गौरव कैलास शित्रे (22) हे सर्व रा. शिवनी शिवार, जिल्हा अकोला येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी या तिघांना अटक केली, आणि त्यांची तपासणी केली. तपासादरम्यान, त्यांनी चोरी केलेल्या बकरी व बोकड यांची कबूली दिली. तसेच चोरीसाठी वापरलेली वाहन क्रमांक एमएच 26 बीई 1747 हे सुध्दा जप्त केले आहे. यावेळी पोलिसांनी बकऱ्या आणि बोकड किंमत 22 हजार आणि वाहन किंमत 1 लाख असा एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांच्या पुढील तपासासाठी हे आरोपी न्यायालयीन कोठडीत पाठवले आहेत. हिवरखेड पोलिसांचे पोहेकॉ चव्हाण आणि नापोकॉ. प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलिसांनी स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे डोणगाव येथे जाऊन ही मोठी कारवाई केली.
