*तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली सभा च अवैध असल्याचा घेतला होता आक्षेप*
मलकापूरः(प्रफुल्ल बिचारे):
३१ मे रोजी आलेल्या अविश्वास ठरावाला मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांनी नागपूर मा. उच्च न्यायालयात आक्षेप घेतला होता. सदर सभा ही तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. मात्र ती सभा घेण्याचा अधिकार नसल्याचा आक्षेप त्यांनी मा. उच्च न्यायालयात घेतला असता आज झालेल्या सुनावणीत ज्या परिस्थितीत आहे त्याच परिस्थितीत ठेवण्याचा आदेश मा. उच्च न्यायालयाचे न्यायाधिश जी. ए. सानप यांनी आज ७ जून रोजी दिला असल्याची माहिती शिवचंद्र तायडे यांनी दिली. त्यामुळे सभापती निवड रखडण्याची शक्यता आहे.
३१ मे रोजी कृषी उत्पन्न १३ बाजार समितीच्या संचालकांनी सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास आणला होता. मात्र ही सभाच अवैध असल्याचे शिवचंद्र तायडे यांनी मा. उच्च न्यायालयात या सभेविरुध्द आक्षेप घेतला होता. सदर सभा ही तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. ही सभा घेण्याचा तहसीलदार यांना अधिकार नसल्याचा आक्षेप घेत शिवचंद्र तायडे यांनी नागपूर मा. उच्च न्यायालयाते अॅड. आर. डी. कारोडे यांचेमार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर युक्तीवाद होत असतांना नवीन सभापती निवडीची प्रक्रिया सुरू न झाल्याने पुढील तारखेपर्यंत 'स्टेटस्को' म्हणजेच यथास्थिती ठेवण्याचा आदेश नागपूर मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी दिला असून यावेळी सभापती शिवचंद्र तायडे यांच्या वतीने अॅड. आर. डी. कारोडे, शासनाच्या वतीने अॅड. डी. आय. चर्लेवाल तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अॅड. ए. एम. घारे यांनी काम पाहिले. या सर्व प्रकरणाची शहरात एकच चर्चा रंगली असून नवीन सभापती निवडीला स्थगिती मिळाल्याने शिवचंद्र तायडे यांना दिलासा मिळाल्याचे चित्र असून येणाऱ्या तारखेत अविश्वासाची झालेली सभा वैध ठरतेकी अवैध ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अद्यापही सभापती पदाचा कार्यभार त्यांच्याकडेच असल्याची माहिती शिवचंद्र तायडे यांनी दिली आहे.

