संतापजनक घटना : नांदुरा तालुक्यातील खुमगाव येथील आई भवानी मंदिरातील देवीचे चांदीचे डोळे चोरट्यांनी काढून नेले
नांदुरा प्रतिनिधी :अरुण सुरवाडे
तालुक्यातील खुमगाव परिसरात अत्यंत संतापजनक अशी घटना घडली असून गावाचे आराध्य दैवत असलेल्या आई भवानी मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवीच्या मूर्तीचे सुमारे १६ चांदीचे डोळे काढून नेल्याची घटना आज उघडकीस आली.
सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी भाविक गेले असता देवीच्या मूर्तीवरील चांदीचे डोळे गायब असल्याचे दिसून आले. ही बाब समोर येताच ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गावाच्या श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातच अशा प्रकारची चोरी झाल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वीही गावातील आराध्य दैवत असलेल्या श्री देवधरी महाराजांच्या चांदीच्या पादुकांची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतरही मंदिरांच्या सुरक्षेबाबत पुरेशी खबरदारी घेतली गेली नसल्याची चर्चा गावात सुरू आहे.
तसेच बुर्ती येथील श्री हनुमान मंदिरातही पुजेचे ताट चोरीला गेल्याची घटना घडली असून हनुमानजींच्या मूर्तीचे डोळे काढण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात मंदिरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा वावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या सोने व चांदीच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर अशा घटना वाढत असल्याने ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्ती व फेरीवाल्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
या प्रकरणाची नांदुरा पोलीसात तक्रार दाखल केली असून पोलीसानी सखोल चौकशी करून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
